Mumbai News : मुंबई आणि उपनगरसह राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज मुंबईतील (Mumbai Rains) अनेक भाग जलमय झाले आहे. या दमदार पावसाचा फटका लोकल ट्रेन्स आणि वाहतूक व्यवस्थेवर ही दिसून आले आहे. तर या पावसाच्या पाण्याचा फटका आता चक्क केईएम रुग्णालयाला ही बसल्याचे बघायला मिळाले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयातील तळमजल्यात  पाणी साचले आहे. पावसाचे पाणी अगदी तळमजल्यापर्यंत शिरले असून  रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग (पीआयसीयू) पर्यंत पाण्याचा शिरकाव झाला आहे. ज्यामुळे रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठी गैरसोय झाली असून रुग्णालय प्रशासनात चिंता निर्माण झाली आहे.

Continues below advertisement


पुढे आलेल्या माहितीनुसार, केईएम रुगाणालयातील रेडिओलॉजी डिपार्टमेंटसमोर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कर्मचाऱ्यांच्या वतीने पाणी काढण्याच काम सुरू आहे.  मात्र हा रुग्णालयात रुग्णांचा येण्याजाण्याचा रस्ता असल्यामुळे या भागात मोठी गर्दी देखील झाली आहे. 


पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली 


मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते अडीच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिसांनी सबवे बाहेर बॅरिकेट लावून सबवे बंद केला आहे. सध्या अंधेरी सबवे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहन चालकांना अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्यासाठी पोलीस सूचना देत आहे. सध्या सबवेमध्ये भरलेला पाणी पालिकेचे कर्मचारी जनरेटरच्या माध्यमातून बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.


महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम


मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहेत. पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचारी ठिकठिकाणी अथकपणे कार्यरत राहून सेवा बजावत आहेत. तसेच, भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी पसरू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या