Mumbai Heavy Rainfall मुंबई : सध्या मुंबईसह राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर भारतीय हवामान खात्याने आज, मंगळवार (19 ऑगस्ट 2025) रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी (मुंबई शहर व उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून या दमदार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रात अचानक इतका पाऊस का पडतोय? शिवाय अजून किती दिवस या पावसाच्या सरी राज्यात कोसळणार? याबाबत पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी महत्वपूर्ण माहिती दिलीय, ती जाणून घेऊ.
दरम्यान, मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय. तर उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात निर्माण झालेली एकंदरीत पावसाची परिस्थिती बाबत हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांना विचारले असता ते म्हणाले कि, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळ राज्यात आज मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. मात्र उद्यापासून (20 ऑगस्ट 2025) पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आलाय. मुंबईत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवार पासून पावसाचा जोर कमी होईल ,असा पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. मुंबई, कोकणला रेड अलर्ट असून पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबईत अचानक एवढा एवढा पाऊस का पडतोय?
मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडतो आहे. सोबतच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. परिणामी द्रोनीय रेषा तयार झाली आहे, जी उत्तर कोकण ते केरळपर्यंत आहे. त्यामुळेच कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात आणि घाट माथ्यांवर मुसळधार तर उर्वरित राज्यात पावसाच्या सरी कोसळतांना दिसत आहेत.
मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद
मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाला आहे.ही माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात अतिवृष्टी झाली आहे. पुढील 24तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.सध्या दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी उपनगरात अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. मुंबईची मिठी नदी कोपली की, मुंबईत हाहा:कार माजतो. याचा प्रत्यय मुंबईकरांनी आणि लगतच्या उपनगरांनी 26 जुलैच्या पावसात घेतला आहे. सध्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे.
सध्या मिठी नदी 4.7 मीटरवरुन वाहत आहे. पण, मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून मिठी नदीच्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत आहे. तसेच, इतर भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मिठी नदीच्या किनाऱ्यावरील कुर्ला, वांद्र्याच्या किनारी भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा