Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील एक भयावह घटना (Mumbai Crime News) समोर आली आहे. रिक्षाचालकाने 21 जानेवारी 2025 रोजी 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना राम मंदीर परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपीने अत्याचार केल्याचं कबूल केलं आहे. सदर घटनेनं मात्र मुंबई हादरली आहे.
सदर घटनेतील आरोपी रिक्षाचालकाचं नाव राजरतन सदाशिव वायवळ असून तो 32 वर्षांचा असून त्याला 2 मुली असल्याची माहिती मिळाली आहे. राजरतन सदाशिव वायवळला नालासोपारा वाळीव येथील खैरपड्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमूखे वनराई पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर 21 जानेवारी 2025 रोजी बलात्कार करण्यात आला. सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला रिक्षाचालकाने पीडितेवर हल्ला केल्याचं समोर आलं. तसेच मुलीच्या गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही घालण्यात आले. पीडित मुलगी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात 22 जानेवारी रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळली. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील तपास वनराई पोलीस करत आहे.
वनराई पोलिसांनी कोणती माहिती दिली?
वनराई पोलीस ठाण्यास दिनांक 22/01/25 रोजी महिला नामे वय 20 वर्षे ही एकटी मुलगी गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानक परिसरात मिळून आल्यानंतर तिचेवर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर महिलेकडे नमूद घटनेच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असता, तिने दि. 21/01/25 रोजी रात्री वसई स्टेशन परिसरात भेटलेल्या एका अनोळखी रिक्षा चालकाने तिच्यावर वसई जवळील सागरी बीचवर जबरदस्तीने संभोग केल्याचे सांगितल्याने तिचा सविस्तर जबाब नोंद करुन वनराई पोलीस ठाणे गु.र.क्र.27/25, कलम 64 (2) (एम) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हाच्या तपासाकरीता परिमंडळीय पथके तयार करण्यात आली. बळीत मुलीकडून प्राप्त माहितीच्या आधारे विरार ते चर्चगेट रेल्वे परिसर, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे आरोपी नामे राजरतन सदाशिव वायवळ, वय 32 यास खैरपाडा, वालीव येथील झोपडपट्टीमधुन ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश आले.