मुंबई: मान्सूननं आपलं आगमन थोडसं लांबवल्यामुळं इकडं भाज्यांचे दर कडाडले आहेत. मार्केटमध्ये भाज्यांची होणारी आवक मंदावल्यामुळं भाज्याचे दर वाढले आहेत. टोमॅटोचा दर 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर दोडका, फ्लॉवर, तोंडली आणि कारलंही कडू झालं आहे.

 

भेंडी 70 रुपये किलोनं मिळत असल्यानं ग्राहकांना भेंडीचे काटे टोचत आहेत. तर 70 किलोनं मिळणारी मिरची चांगलीच झिणझिण्या आणत आहे. कोथिंबीर 25 रुपये जुडी, लसूण १६० रुपये किलो भावने बाजारात आहे.

 

एकीकडे भाज्या महागल्या असल्या तरी कांद्याचे भाव गडगडले असून कांदा केवळ 10 रुपये किलोनं मिळतो आहे. भाज्यांचे दर वाढल्यानं गृहिणींचं बजेट मात्र पार कोलमडलं आहे.

 

दरम्यान, जूनची 14 तारीख उलटली तरीही मान्सूननं अजून महाराष्ट्राला दर्शन दिलेलं नाही. जवळ जवळ राज्यातील सर्वच जिल्ह्यात पाणीसाठा मृत अवस्थेत आला आहे. अजूनही हवामान विभाग आपल्या तर्कवितर्कांमध्ये गुंतलं आहे. आता मान्सून 19 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या 4 दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.