मुंबई : देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. ईडीच्या मागणीनंतर विशेष न्यायालयानं विजय हा निर्णय दिला.

 

ईडीच्या कोणत्याही नोटीशीला भीक न घालणाऱ्या विजय मल्ल्याला फरार घोषित करण्याची मागणी ईडीनं विशेष न्यायालयात केली होती. प्रसारमाध्यमातून आपली बाजू मांडणारा विजय मल्ल्या तपास यंत्रणेपासून पळ काढत असल्याचं ईडीनं न्यायालयाला सांगितलं.

 

ईडीची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं विजय मल्ल्याला फरार घोषित करण्याचा निर्णय दिला. धक्कादायक बाब म्हणजे तपास यंत्रणेच्या रडारवर असणाऱ्या विजय मल्ल्यानं चोरीछुपे कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकल्याचं समजतंय.

 

 

विजय मल्ल्याची १४११ कोटींची मालमत्ता जप्त



काहीच दिवसांपूर्वी ईडीने विजय मल्ल्याची 1411 कोटींची मालमत्ता आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मल्ल्याच्या बँक खात्यातील 34 कोटी रुपये, बंगळुरु आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट, चेन्नईमधील 4.5 एकरचा औद्योगिक भागातील प्लॉट, 27.75 एकर कॉफीची बाग, यूबी सिटीमधील निवासी घर, तसेच बंगळरुमधील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.