Drinking Alcohol and Health: आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोकं, मित्र-मैत्रिणी सहवासात येत असतात. यामध्ये काहींजण फुडीज प्रकारातील असतात तर काहीजण मद्यप्रेमी असतात. तर काहीजण ह्या दोन्ही प्रकारात मोडतात. अशा प्रकारच्या मित्र-मैत्रिणींच्या चर्चेत कधीतरी मद्यप्राशनाच्या मुद्यावरून चर्चा होत असतात.
मद्यप्राशन करण्याचे प्रकार आणि किती प्रमाणात मद्यप्राशन करणे गरजेचे आहे याबाबतही विचारविनिमय होतो. मद्य सेवनाच्या सवयीला आरोग्याशी जोडून पाहिले जात असते.
काही लोकांना एक-दोन पेग मद्य पिल्यामुळे आरोग्यावर काही परिणाम होत नाही, असे वाटत असते. अनेकदा सर्दी-खोकला, थंडी-ताप आदी प्रकारच्या आजारात उपाय म्हणूनदेखील काही जण मद्याचा प्याला जवळ करतात.
खरंच दारू पिणे हृदयासाठी धोक्याचे आहे का?
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, मद्याचे जाणकार आर्ची कोक्रेन यांना एका संशोधनात मद्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे आढळून आले. आर्ची यांनी अमेरिका, ब्रिटेन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये संशोधन केले. मद्य प्राशन केल्याने विशेषत: वाईनचा परिणाम हृदयावर होतो.
संशोधन कसे केले?
वर्ष 2005 मध्ये वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्यांवर एक संशोधन करण्यात आले होते. या संशोधनात 32 हजार महिला आणि 18 हजार पुरुषांचा समावेश होता. या संशोधनात हृदयविकाराच्या झटक्याचा शरीरावर होणाऱ्या परिणामाचा संबंध काय? यावरदेखील भर देण्यात आला होता. या संशोधनानुसार, लोकांनी आठवड्यात तीन-चार वेळा मद्य प्राशन केले अथवा एक किंवा दोन पेग मद्य प्राशन केले तरी त्यांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी असतो. मद्यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम हिमोग्लोबिन ए1 वर होतो.
मद्याचा प्याला हाती घेण्याआधी हे जाणून घ्या
एक-दोन पेग पिणार्यांपेक्षा न पिणार्यांसाठी दारू जास्त धोकादायक आहे का? या संशोधनात एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे दारू प्यायल्याने हृदयविकाराचा त्रास कमी होवो अथवा न होवो..मात्र, इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे.
WHO च्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटले?
दारू जास्त प्रमाणात प्राशन केल्यामुळे नैराश्य, बैचेनी, स्वादुपिंडाचा दाह, आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होणे, अपघात यासारखी धोकादायक प्रकरणे समोर येत असतात. याशिवाय जास्त प्रमाणात दारू प्राशन केल्यामुळे लिव्हर, पोट, घसा, नाक आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. तसेच, दररोज एक ग्लास दारू प्राशन केल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 4 टक्क्यांनी वाढतो. जर हेच दारू प्राशन करण्याचे प्रमाण जास्त वाढले तर 40 ते 50 टक्के याचा धोका वाढतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. उपचारासंबंधी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टर अथवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा)