नाशकात तृप्ती देसाईंच्या गाडीवर दगडफेक, भूमाताच्या कार्यकर्त्या जखमी
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2016 02:16 AM (IST)
नाशिक: भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्या कारवर नाशिकमध्ये दगडफेक करण्यात आली. २० ते २५ दुचाकींवर आलेल्या जमावाने देसाई यांच्या गाडीवर दगडफेक केली. मध्यरात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. तृप्ती देसाईंच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत गाडीच्या सर्व काचा फुटल्या. तर भूमाताच्या काही कार्यकर्त्या जखमी झाल्या आहेत. तृप्ती देसाई या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पंचवटी भागात गेल्या होत्या. मात्र, त्याच भागात असलेल्या कपालेश्वर मंदिर परिसरात त्या पोहोचल्या. तिकडे जमलेल्या लोकांना तृप्ती देसाई पुन्हा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आल्या असं वाटलं त्यावेळी त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. असं देसाई यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर दुचाकीवर असलेल्यांनी त्यांचा २५ किमी पाठलाग केल्याचंही त्यांनी सांगितंल आज सकाळी तृप्ती देसाई या पोलिसांत तक्रार नोंदवणार आहेत.