सोलापूर: अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासाच्या आत पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेत.


राज्यभरात काल झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळी 7 वाजता सदाभाऊ खोत शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. पंढरपूर तालुक्यातील सरकवली, ओझेवाडी या गावांची सदाभाऊंनी पाहणी केली.

अवकाळी पावसात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच घरांची पडझड झाल्यास त्याचीही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.



काल सोलापूर जिल्ह्यासह लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड परिसराला अवकाळीने झोडपलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिल्यानंतर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत पहाटेच पंढरपुरात दाखल झाले. सदाभाऊ यांच्यासोबत कृषी, महसूलसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली.

अर्ध्या तासांच्या गारपीटीमुळे द्राक्षे आणि डाळिंबाचे अतोनात नुकसान झालं आहे. सरकवली येथील प्रदीप घुले यांची फळाला आलेली 7 एकर द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली असून, झाडावरील द्राक्षांचे घड बागेत पडले आहेत.



अनेक द्राक्षांची झाडे आडवी झाली असून झाडावर असलेले द्राक्ष मणी गारांच्या तडाख्याने फुटल्याने एका रात्रीत हा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे . ही 7 एकर बाग फळावर येईपर्यंत घुले यांनी एकरी लाखभर रुपयांप्रमाणे खर्च केला होता. आता बेदाणे आणि द्राक्षातून 15 दिवसांत त्यांना एकरी 4 लाखाचे उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र आता होतं नव्हतं सगळं गेलं.

ओझेवाडी येथील मोहन क्षीरसागर यांनी  डाळिंबाची बाग लावली होती. कालपर्यंत 10 लाखाचे एकरी उप्तन्न मिळण्याची आशा असलेले क्षीरसागर यांच्या बागेला गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला.



दरम्यान पंढरपूर - मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनाही या गारपिटीचा फटका बसला असून त्यांच्या द्राक्षे बागेचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

सदाभाऊ खोत यांनी या सर्व ठिकाणाला भेटी देऊन पाहणी करीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या मोठ्या नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांशी खोत यांनी शिवारात आणि ग्रामपंचायत कार्यालयात संवाद साधला.