नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुढील महिन्यात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. संसदीय अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच 12 एप्रिलनंतर मंत्रिमंडळात बदल आणि विस्तार होण्याची शक्यता आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्यासाठी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हे फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मनोहर पर्रिकर यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कारभार अर्थमंत्री अरुण जेटलींना सोपवण्यात आला आहे. दोन्ही मंत्रालयं अत्यंत जबाबदारीची असल्यामुळे संरक्षण खातं नव्या मंत्र्याला सुपूर्द केली जाण्याची चिन्हं आहेत.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्यामुळे त्यांच्या खात्यातही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. लोकसभेत बुधवारी स्वराज यांनी हजेरी लावत 15 मिनिटांचं भाषण ठोकलं. ऑपरेशननंतर त्या पहिल्यांदाच लोकसभेत आल्या होत्या.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्मृती इराणी यांचं मनुष्यबळ विकास खातं काढून घेऊन त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. सदानंद गौडा यांची कायदे मंत्रालयातून सांख्यिकी विभागात रवानगी झाली होती.