रांची: कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं रांची कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर चार बाद 299 धावांपर्यंत मजल मारली. तर मॅक्सवेलनंही नाबाद 82 धावा फटकावल्या.


स्मिथनं आपल्या कसोटी कारकीर्दीतलं 19वं शतक साजरं केलं आणि कांगारूंच्या डावाला आकार दिला. त्यानं पीटर हॅण्ड्सकोम्बसह चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. स्मिथनं मग ग्लेन मॅक्सवेलसह पाचव्या विकेटसाठी 159 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा स्मिथ 117 धावांवर तर मॅक्सवेल 82 धावांवर खेळत होता. त्याआधी मॅट रेनशॉनं 44 धावांची खेळी केली होती. भारताकडून उमेश यादवनं दोन तर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी एक विकेट काढली.

आज पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी कांगारूंच्या फलंदाजीला वेसण घातली होती. पण स्मिथनं आधी पीटर हॅण्ड्सकोम्बसह अर्धशतकी भागीदारी रचली मग ग्लेन मॅक्सवेलसह आणखी एक अर्धशतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला.

दरम्यान, टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या मॅट रॅनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र, रवींद्र जाडेजाने वॉर्नरला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करुन कांगारुंना पहिला धक्का दिला. वॉर्नर 19 धावा करुन माघारी परतला. यानंतर मग उमेश यादवने रॅन्शॉला(44)  माघारी धाडलं, तर अश्विनने शॉन मार्शला (2) तंबूत पाठवून तिसरा धक्का दिला.

मग स्मिथ आणि हॅण्ड्सकोम्बने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेश यादवनं त्याला 19 धावांवर पायचित केलं. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजाना यश मिळू शकलं नाही. स्मिथ आणि मॅक्सवेल यांनी झुंजार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

संबंधित बातम्या:

डाईव्ह मारताना कोहलीला दुखापत, मैदानातून बाहेर