बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा गुजरात सीमेवर रोखली!
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2017 02:12 PM (IST)
नंदूरबार : आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुजरातच्या सीमेवर आमदार बच्चू कडू यांची शेतकरी आसूड यात्रा अडवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगरमध्ये उद्या आसूड यात्रा पोहोचणार होती. पण, त्याआधीच आज नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर ही आसूड यात्रा रोखण्यात आली. चेकपोस्टच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या गुजरात पोलिसांनी बच्चू कडुंना गुजरातमध्ये प्रवेश करु दिला नाही. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अडवणुकीचा निषेध केला. सध्या चेकपोस्टर गुजरात पोलिसांना प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे.