नवी दिल्ली : येत्या 1 डिसेंबरपासून देशात अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होणार आहे. आपल्याला या बदलांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. नक्की कोणते बदल होणार आहेत पाहुयात.


RTGS सुविधेचा फायदा


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. त्यामुळे आता नागरिक RTGS द्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करु शकतात. सध्या RTGS सुविधा बँकांच्या कामकाजाच्या दिवशी (दुसरा व चौथा शनिवार वगळता) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु असते. तर NEFT सुविधा डिसेंबर 2019 पासून 24 तास सुरु आहे.


एलपीजी किंमतीत बदल


दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेते. म्हणजेच 1 डिसेंबर रोजी देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती बदलतील. गेल्या महिन्यापासून या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.


अनेक नवीन रेल्वे गाड्या धावतील


येत्या 1 डिसेंबरपासून अनेक नवीन रेल्वे गाड्या धावणार आहेत. कोरोना संकटापासून रेल्वे अनेक नवीन विशेष गाड्या सातत्याने चालवत आहे. 1 डिसेंबरपासून धावणाऱ्या गाड्यांमध्ये झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेलचा समावेश आहे. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत चालवल्या जात आहेत. 01077/78 पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल ट्रेन दररोज धावतील.


विमाधारक प्रीमियम बदलू शकतील


बर्‍याच वेळा लोक त्यांच्या विमा पॉलिसीचा हप्ता भरत नाहीत आणि त्यांची पॉलिसी संपते. यामुळे त्यांचे विम्याद्वारे साठवलेले पैसेही बुडतात. परंतु आता नव्या व्यवस्थेनुसार आता पाच वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्के कमी करू शकणार आहेत. म्हणजेच अर्धा हप्ता देऊन ते पॉलिसी चालू ठेवू शकतील.