Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Protest) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. मनोज जरांगे यांनी कालपासून पाणी पिणंही बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येतंय. यादरम्यान काल रात्री (1 सप्टेंबर) शासनाच्या डॉक्टरांची टीम मनोज जरांगे यांची प्रकृती तपासण्यासाठी आली होती. यावेळी डॉक्टरांची टीम दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंनी देखील तपासणीसाठी तयारी दर्शवली. मात्र डॉक्टरांनी आणलेल्या तपास यंत्रणा पाहून मनोज जरांगे चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
मनोज जरांगेंनी डॉक्टरांना सुनावले, आझाद मैदानात काय घडलं?
सध्या मराठा समाजासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत खालावली. अशातच काल (1 सप्टेंबर) तपासायला आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगेंनी फटकारलं. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांकडचे तपासणी यंत्र हे तूटलेले असल्याने तपासणी नाकारली. रक्तदाब तपासणाऱ्या यंत्र हे चिंध्या बांधलेलं व तुटलेलं आहे म्हणून मनोज जरांगे यांनी डॉक्टरच्या पथकाला जाण्यास सांगितले. तसेच तपासणी करायला आलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करा, अशी मनोज जरांगे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी केली.
आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत.
आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवले-
हायकोर्टात काल (1 सप्टेंबर) मराठा आंदोलनाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं. तर त्याचवेळी सरकारनं योग्य अंमलबजावणी न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत, असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला. मनोज जरांगे पाटील वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या या निर्देशानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.