Mahayuti: राज्यातील महायुती सरकारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे बोललं जात आहे. महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या (BJP) वाट्याला 48 टक्के पदे येतील. तर शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला 29 टक्के, तर राष्ट्रवादीला (NCP) 23 टक्के महामंडळ मिळणार आहेत. राज्यात एकूण 138 महामंडळांमध्ये 785 सदस्य संख्या आहे. तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महामंडळांचे वाटप करतील अशी देखील माहिती आता पुढे आली आहे.

नाराजी दूर करण्यासाठी महामंडळ अध्यक्षपदावर नियुक्ती?

महायुतीच्या समन्वय समितीमध्ये महामंडळ वाटपाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात येणार आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी राहू नये, यासाठी महायुती सक्रिय झाली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नाराज आमदारांनी आता महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. या वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. महामंडळांवरील नियुक्त्या हा सत्तावाटपाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, ज्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि आमदारांना योग्य स्थान मिळते. यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होण्यास मदत होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महायुती समन्वय समितीच्या बैठकीत ठरली विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती

शिंदे गटाचे मंत्री  शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महायुती समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, शंभुराज देसाई, उदय सामंत, सुनील तटकरे व हसन मुश्रीफ उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. या विजयी मेळाव्याची पोलखोल करण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखण्यात आल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी झालेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचे समजते. 'महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा', अशी स्पष्ट सूचना सर्वांना दिली. महायुतीमध्ये वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करु नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीमधील (Mahayuti) वाचाळवीर आमदारांना दिली होती.

हे ही वाचा