जळगाव: चाळीसगावच्या कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. राजकीय वादातून तरुणाची गोळ्या घालून हत्या झाल्याचं तपासात उघड झालं असून पोलिसांनी या घटनेतील तीन संशयितांना अटक केली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील बोढरे शिवारात आढळलेल्या मृतदेहाचा तपास करताना त्याचा राजकीय वादातून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख जगदीश झुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. शिंदखेडा, जि. धुळे), अशी असून त्याची गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
वाढदिवसाच्या बहाण्याने नेलं अन्
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे. आरोपींमध्ये वीरेंद्रसिंग उर्फ विकी तोमर (रा. टाकळी प्रचा), शुभम सावंत व अशोक मराठे (दोघेही रा. मोरदड, जि. धुळे) यांचा समावेश आहे. गावातील राजकीय वादातून हत्या करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मयताची पत्नी अरुणा ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढदिवसाच्या बहाण्याने आपल्या पतीला घराबाहेर नेत हा खून झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिली मोठी माहिती
पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी माहिती प्राप्त झाली होती की चाळीसगाव कन्नड परिसरात एका पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर आम्ही तत्काळ गुन्हा दाखल केला आणि पाहणी केली असता 35 ते 40 वर्षांच्या व्यक्तीचा तो मृतदेह होता. मयत व्यक्तीबाबत पोलिस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल होती असे आढळून आले होते. त्यानंतर नातेवाईकांना संपर्क साधला, त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यांच्याकडून आधिक माहिती घेत असता मयत व्यक्तीची पत्नी अरुणा ठाकरे यांनी फिर्याद दिली त्यांच्या पतीची काही राजकीय मैत्री होती, ते वारंवार त्यांना पार्टीसाठी घेऊन जात होते. दोन दिवसांपूर्वी ते मित्राच्या वाढदिवसाला जातो असं सांगून गेले होते, त्यानंतर ते घरी परतलेले नव्हते. त्यानंतर आता पती खून केलेल्या अवस्थेत सापडलेले आहेत. त्यामुळे त्यांचे मित्र बनून आलेल्यांनी त्यांचा खून केला आहे. त्यानंतर तपास करून तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. गावातील राजकीय वादातून हत्या करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे,अशी माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी दिली आहे.