पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषदेत ऐरणीवर आलेल्या ब्लेझर सक्तीच्या आदेशाला बहुतांश गुरुजींनी फटकारले. परंतु माळशिरस आणि दक्षिण सोलापुरात काही ठिकाणी मात्र शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनीही ब्लेझर घालून या निर्णयाचे स्वागत केल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतले गुरुजी सुटाबुटात दिसले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी आजपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांना ब्लेझरची सक्ती केल्याने सर्वच शिक्षक संघटनांनी या निर्णयावर बहिष्कार घातला होता. आज दिवाळीच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या त्यामुळे सगळ्यांनाच या ब्लेझरबाबत उत्सुकता होती. शिक्षकांवर दबाव आणण्यासाठी आज जिल्हाभरातील शाळांची तपासणी करण्यासाठी पथके पाठवण्यात आली होती. मात्र या पथकाचा दबाव आज जिल्ह्यातील ८० टक्के शिक्षकांनी झुगारून देत केवळ गणवेश परिधान करुन ब्लेझर शिवाय शाळेत हजेरी लावली.

मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नास तयार असताना आणि गणवेश घालण्यास सर्वानुमते संमती दिली असताना हा ब्लेझरचा अट्टाहास का असा सवाल शिक्षक संघटनांनी केला होता. मात्र याबाबत भारूड यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने कारवाईला न घाबरता सर्वच शिक्षक संघटना या निर्णयाच्या विरोधात उभ्या ठाकल्याने ब्लेझर सक्तीच्या निर्णयाचे आज तीनतेरा वाजले.

परंतु माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही शाळांनी चांगला प्रतिसाद दिला असून माळशिरस तालुक्यातील तिरावांडी आणि धर्मपुरीच्या शाळेत शिक्षकांसोबत विद्यार्थीही ब्लेझर मध्ये शाळेत आले होते. याबाबत बोलताना माळशिरस तालुक्यातील २५ टक्के शिक्षक ब्लेझर मध्ये आल्याचा दावा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केला आहे.

पंढरपुरातील शिक्षकांकडे गणवेश आहेत पण ब्लेझर नसल्याची कबुली शिक्षणाधिकारी सुलभ वाठार यांनी दिली. आता प्रशासनाने ही माहिती संकलित करून ब्लेझरला विरोध करणाऱ्या शिक्षकांवर गंभीर कारवाईचा इशारा यापूर्वीच दिला असल्याने जिल्हा परिषद शिक्षक आणि प्रशासनातील वाद आता टोकाला जाणार हे नक्की.