मुंबई: मी मुस्लीम असल्यामुळेच काँग्रेसमध्ये माझ्यावर अन्याय झाल्याचा थेट आरोप आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी केला. मी फक्त मुस्लिम असल्यामुळेच युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येऊनही दोन वर्षे मला त्रास देण्यात आल्याचं सांगत मुस्लिम होणं काँग्रेसमध्ये पाप आहे का असा सवालही त्यांनी विचारला. मुंबई युवक काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 


माझे वडील राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर माझ्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पण त्याबाबत पक्षाने अद्याप माझ्याशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही असं झीशान सिद्दीकी म्हणाले. काँग्रेसमध्ये अनेक घराण्यांमध्ये दोन, तीन, चारजणांना तिकीटं देण्यात आली आहेत, पण मला नाही म्हटलं. हा नियम फक्त मुस्लिमांसाठी लागू आहे का असा सवाल त्यांनी विचारला. जो कायदा आणि नियम हे सर्वांसाठी बनवले जातात, ते फक्त मुस्लिमांसाठी का बदलले जातात असा सवाल त्यांनी विचारला.


काय म्हणाले झीशान सिद्दीकी? 


माझे वडील राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले, मात्र तरीही मी कॉंग्रेसमध्येच आहे हे मी वारंवार सांगितलं. तरी देखिल माझ्या विरोधात मुंबई प्रदेश युवक काँग्रेस पदावरुन हटवण्याची कारवाई केली गेली. मी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बैठकीतही हजेरी लावली होती. मुंबई युवक कॉग्रेसची निवडणूक लढून मी जिंकून आलो होतो. मला त्यावेली 90 टक्क मते मिळाली होती. मात्र जिंकल्यानंतरही मला युवक काँग्रेस अध्यक्षपदावर नियुक्त होण्याकरता 9 ते 10 महिने लागले. 


कर्नाटकच्या युवक काँग्रेसबाबतीतही असंच झालं. तो मुस्लिम असल्याने त्याच्याबाबतही तसंच झालं. मला दु:ख होतंय की काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांकांना स्थान नाही. दोन मुस्लिम उमेदवारांना चांगली मते मिळूनही युवक काँग्रेसचे पद देण्यात आले नाही. काँग्रेस नेहमी मुस्लिम समूदायाबाबत सकारात्मकतेनं बोलत असते. मात्र तसे वागत नाही. 


जास्त मुस्लिम लोक टीममध्ये घेऊ नको असे मला सांगण्यात आले होते. मुंबई काँग्रेसची लिस्ट काढून बघा, किती वरिष्ठ नेतेपदी मुस्लिम आहेत? जर काँग्रेसला अल्पसंख्यांकांची कदर नसेल तर आम्हालाही आमचे पर्याय शोधावे लागतील. मी काँग्रेस पक्षात यापुढे राहील असं मी म्हणणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून, चर्चा करुन मी माझे राजकिय पर्याय शोधेन. 


काँग्रेसला वारंवार अल्पसंख्याकांना गृहीत धरता येणार नाही.  काँग्रेसला आमची गरज नाही मग इथे राहून उपयोग काय? 


ही बातमी वाचा :