भिवंडी : प्रेमभंग झाल्याच्या रागातून एका तरुणाने दुचाकी जाळल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे. अरविंद यादव (वय 28 वर्ष) असं या तरुणाचं नाव असून भंडारी कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. दुचाकी जाळण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याआधारे नारपोली पोलिसांनी माथेफिरुला अटक केली आहे.
भिवंडीत राहणाऱ्या एका तरुणीवर अरविंद यादवचं एकतर्फी प्रेम होतं. गेल्या वर्षाभरापासून तो तरुणीची येता-जाता छेड काढण्याचा प्रयत्न करत असे. यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी अरविंदच्या नातेवाईकांची भेट घेऊन हा सर्व प्रकार सांगितला. काही दिवसांपूर्वीच संबंधित तरुणीचा साखरपुडा झाला. परंतु अरविंदने होणाऱ्या नवऱ्यालाही मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
अखेर 18 सप्टेंबरच्या रात्री अरविंदने तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या दुचाकीच्या पेट्रोलचा पाईप तोडला. पेट्रोल जमिनीवर सांडल्यानंतर त्याने माचिसने आग लावली. पेट्रोलमुळे आगीचा भडका झाला आणि तीन ते चार दुचाकी खाक झाल्या.
हा सर्व प्रकार शेजारी असलेल्या स्टार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याआधारे पोलिसांनी अरविंद यादवला अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास निजामपुरा पोलिस करत आहेत.