बिबट्याने आई-वडिलांसमोरच 3 वर्षांच्या मुलाला उचलून नेलं!
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2016 07:47 PM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. निफाड तालुक्यातील गोदानगरमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सार्थक महेश सोळशे असं मृत मुलाचं नाव आहे. सार्थकचे आई-वडील शेतमजूर आहेत. तो त्यांच्यासोबत शेतात गेला होता. मात्र त्याचवेळी तिथे बिबट्याने हल्ला केला. आई-वडिलांसोबतच बिबट्याने मुलाला उचलून ऊसाच्या शेतात नेलं. या घटनेनंतर तिथेच एकच हल्लकल्लोळ माजला. बिबट्याच्या तावडीतून सार्थकला सोडवण्यासाठी तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. बिबट्याचा शोध घेण्यासाठी गावकरी त्याच्या मागे गेले. मात्र तोपर्यंत बिबट्याने त्याचा फडशा पाडला होता. या परिसरातील मानवी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याची तक्रार गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली होती. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली होती. मात्र वनविभागाने काही उपाययोजना करण्याआधीच बिबट्याने हल्ला केला आणि त्यात तीन वर्षांच्या मुलाने जीव गमावला