शिर्डी : टिकटॉक व्हिडिओ करताना होणारे अपघात टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र टिकटॉक पुन्हा सुरु झालं, तसं या अपघातांनाही पुन्हा निमंत्रण मिळाल्याचं दिसत आहे. टिकटॉक व्हिडीओ तयार करताना गावठी कट्टयातून गोळीबार झाल्याने एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. शिर्डीच्या भरवस्तीत असलेल्या एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.


शिर्डीतील पवनधाम या हॉटेलमध्ये शिर्डीतीलच रहिवासी असलेले वाडेकर कुटुंबीय दहाव्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. दहावं संपल्यानंतर हॉटेलमधील रुम नंबर 104 मध्ये प्रतीक वाडेकर, नितीन वाडेकर, सनी पवार आणि इतर दोघे बसले होते. यावेळी टिकटॉक व्हिडिओ काढण्याचा मोह या सर्वांना आवरला नाही.

Tik Tok | हातात कोयता घेऊन व्हिडीओ केल्याप्रकरणी एकाला बेड्या | पिंपरी



सनी पवारकडे असलेल्या बेकायदेशीर गावठी कट्ट्याचा व्हिडीओ बनवत असताना अचानक पिस्तुल मधून गोळी सुटली आणि 20 वर्षीय प्रतीक वाडेकर याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीकसोबत असणाऱ्या सर्वांनी तात्काळ घटनास्थळावरुन पोबारा केला. मात्र पोलिसांनी तपास करत या घटनेमागील सत्य बाहेर आणलं. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पिस्तुल कुठून आलं, याबाबत तपास सुरु आहे.

शिर्डी जगातील भाविकांचं श्रद्धास्थान असून रोज हजारो भाविक शिर्डीत येतात. अशावेळी गुन्हेगारीचं प्रमाणही शिर्डीत वाढत चाललं असून  गावठी कट्टे शिर्डीत येतात कसे, याचा तपास होणं गरजेचं आहे.