Kunal Tilak : कसबा मतदार संघाच्या भाजपच्या (Kunal Tilak) उमेदवारीसाठी चर्चेत असलेले कुणाल टिळक यांना सायबर चोरांनी फसवण्याचा (Cyber Crime) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने तिकीट निश्चित केल्याचं सांगून त्यांच्याकडे फोनवरुन पैशाची मागणी केली. हा सगळा प्रकार लक्षात येताच कुणाल टिळक यांनी पक्षाला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आहे.
दिल्लीतील भाजप कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी...
काही दिवसांपूर्वी कुणाल टिळक यांना एका अनोळखी इसमाने मोबाईलवर फोन करून "मी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून बोलतो आहे, असं सांगितलं. यानंतर त्या अनोळखी इसमाने कुणाल यांना "तुमचे आगामी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट निश्चित झाले आहे" असे देखील सांगितले. "तिकीट निश्चित झाल्यामुळे तुम्ही यू पी आय ने या नंबरवर 76,000 रुपये पाठवा, असे देखील सांगितले. मात्र कुणाल यांनी त्या व्यक्तीला कुठलीच दाद दिली नाही आणि हा सगळा प्रकार त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पक्षाला कळवला. कुणाल यांनी कुठलीही दाद दिली नसल्याने सायबर चोरट्यांनी लढवलेली शक्कल कामी आली नाही.
कुणाल टिळक हे भाजप आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कुणाल टिळकांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मुक्ता टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी द्यावी, अशी मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी मागणी केली आहे. कसब्यासाठी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाल यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर चोरांनी केला आहे.
उमेदवार कोण असेल? याकडे सर्वाचं लक्ष
मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यात भाजपकडून काही नावं निश्चित करण्यात आली आहे. शिवाय महाविकास आघाडीतदेखील उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. तिन्ही पक्षाकडून इच्छूक उमेदवारांची मोठी यादी आहे. मात्र कुणाल टिळकांना असा फसवा फोन आल्याने या मतदारसंघावर आता सायबर चोरांची नजर असल्याचं देखील समोर आलं आहे. यामुळे एकीकडे कसबा पोटनिवडणुकीसाठी सगळ्या पक्षाने तयारी केली असली तरी अशा फोन कॉल किंवा मेल, मेसेजपासून सावध राहण्याची गरज आहे.