बीड : आता कोरोना गेला.. कोरोनामुळे काही होत नाही असे समजणार्‍याना भानावर आणणारी घटना बीडमध्ये समोर आली आहे.बीड जिल्हा कारागृहाचे उमदे आणि तरुण कर्तव्यदक्ष कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.


मागच्या सहा महिन्यांमध्ये कोणतेही असे क्षेत्र उरले नाही जिथे कोरोनाने शिरकाव केला नाही अगदी बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना ही कोरोनाची लागण झाली आणि आतापर्यंत 60 पेक्षा जास्त कैदी कोरोनाबाधित झाले. याच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने बीडच्या जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांना बीड शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले.


यादरम्यान उपचार चालू असताना संजय कांबळे यांचे आज पहाटे निधन झाले. खरंतर यापूर्वी बीडच्या जिल्हा अनेक अधिकारी आले आणि गेले असतील मात्र बहुदा त्यांचे नाव सुद्धा इतर क्षेत्रातील कुणाला माहीत झाले नाही. संजय कांबळे हे नाव मात्र बीडकरांचा चांगलेच परिचयाचे झाले होते कारण जेव्हा कांबळे हे बीडच्या कारागृहात रुजू झाले त्यानंतर साहित्य कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक जणांसोबत त्यांचा संपर्क पाहायला मिळाला.


खाकी वर्दीतील साहित्यिक..


तसा खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांचा आणि साहित्य कला क्षेत्राशी दुरूनच संबंध असतो मात्र संजय कांबळे याला अपवाद होते. कारण दिवसातील बराच काळ हा जरी कैद्यांसोबत जात असला समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवण्याची लगबग पाहायला मिळायची. चाळीशीतील अधिकारी असलेले संजय कांबळे यांची मुंबईत नेमणूकीवर असताना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी अजमल कसाब याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. बीडमध्ये कारागृहाच्या सुरक्षेसह त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत पुढाकार घेतला होता. त्यांच्या सुस्वभावामुळे जिल्ह्यात त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने वाढला होता.


अजमल कसाबच्या सुरक्षेवर असताना संजय कांबळे यांनी यातील बारकावे टिपले होते. यावरच त्यांच्या पुस्तकाचे लिखाण सुरू होते आणि लवकरच कसाबच्या कोठडी मधल्या कहाण्या जगासमोर येणार होत्या. मात्र हेच जगासमोर येण्याआधीच संजय कांबळे आणि मात्र जगाचा निरोप घेतलाय.


संजय कांबळे (वय 45) हे गेल्या दोन वर्षापासून बीड येथे सहाय्यक तुरूंग अधिकारी म्हणून कार्यरत होते. संजय कांबळे हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद चे..प्राथमिक शिक्षक असलेल्या संजय कांबळे यांनी स्पर्धा परीक्षेतून तुरुंग आधिकारी पद मिळवलं. कांबळे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत होते. त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होत असे, त्यांचा बीड शहरासह जिल्हाभरात मोठा मित्र परिवार आहे. सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचं मोठ योगदान होतं. जेलमध्ये ते सामाजिक कार्याचे आयोजन करत होते. कैद्याच्या मानसिकतेमध्ये बदल व्हावा यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविण्यात आले होते.


या पूर्वी संजय कांबळे यांच्या कडे उस्मानाबाद, जालना, पैठण या ठिकाणचा काही दिवस चार्ज होता. तेथील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्याकडे चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या चांगल्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. कांबळे यांचे निधन धक्का देणारे आहे. त्यांच्या निधनाची बातमी शहरामध्ये पसरताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.