मुंबई: मुंबईतील 'बेस्ट' च्या मदतीला लाल परी धावलीय . मात्र एसटीच्या विविध विभागातून बेस्टच्या सेवेसाठी मुंबईत आलेल्या एसटीच्या या चालक, वाहक, तसेच इतर कर्मचारी, अधिकारी यांना किती "बेस्ट "सर्व्हिस मिळतेय या बाबत वेळोवेळी प्रकार उघडकीस आलेत . अगोदरच तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी पगार नसल्यानं आर्थिक अडचणीत असतांना आपलं गांव, जिल्हा, विभाग सोडून मुंबईत आलेल्या या कर्मचाऱ्यांना मनस्तापच अधिक सहन करावा लागतोय.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे काल 3 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढण्यात आलंय. त्यात बेस्टच्या ज्यादा वाहतुकीसाठी आलेल्या चालक, वाहक, इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता आणि भोजनाच्या व्यवस्थेसाठी देण्यात येणाऱ्या 200 रुपयाच्या अग्रिमाचा उल्लेख करण्यात आला आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांच्या नाश्ता आणि भोजनाच्या व्यवस्थेसाठी ओयो या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ओयोकडून वेळेत आणि पुरेसा भोजन पुरवठा होत नसल्याचे कारण सांगून ही व्यवस्था बंद करण्यात आली आहे. त्याबदल्यात 4 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांना 200 रुपयांचे अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामागे या कर्मचाऱ्यांत क्षोभ निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं महामंडळाने सांगितले आहे.
'ध' चा 'मा' करणारे कोण?
मूळच्या परिपत्रकात या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या नाश्ता आणि भोजनासाठीचे अग्रीम हे 500 रुपये लिहले असताना ते खोडून केवळ 200 रुपये करणारे 'झारीतील शुक्राचार्य कोण' असा सवाल या कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. हे मधले 300 रुपये कोणाच्या खिशात जाणार, हा 'कट' कोण मारतंय हे जाहीर केले नसले तरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात हात असल्याचं स्पष्ट आहे अशा प्रकारचे मत या कर्मचाऱ्यांतून व्यक्त होतंय.
मुंबईत 'बेस्ट' च्या सेवेसाठी आलेल्या एसटीच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना केवळ प्रति व्यक्ती दोनशे रुपये भोजन भत्ता अग्रीम म्हणून ४ नोव्हेंबर पासून देण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलंय . अग्रीम म्हणजे उचल म्हणून हा २०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे . पगारातून नंतर हा भोजन भत्ता कपात करण्यात येईल असा सरळ सरळ या अग्रीम चा अर्थ होतो अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलीय . या पत्रकात अग्रीम भत्ता म्हणून द्यावयाच्या रकमेवर देखील खाडाखोड करण्यात आल्यानं एसटी प्रशासन कर्मचाऱ्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे . मुंबई सारख्या ठिकाणी २०० रुपयात भोजन ,नाश्ता कसा उपलब्ध होईल असा सवाल देखील या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय.
महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सापत्नपणाची वागणूक
कोरोनाच्या काळातही थकीत पगाराचा मुद्दा असतानाही मुंबईत राज्यभरातील डेपोतून सेवा बजावण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून वारंवार सापत्नपणाची वागणूक देण्यात येतेय. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोईंचा पूर्णपणे लाभ देण्यात येत नाही हेच या परिपत्रकातील खाडाखोडीवरुन लक्षात येते. वरिष्ठ अधिकारी तुपाशी आणि कर्मचारी उपाशी असा काहीसा प्रकार एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होताना दिसतोय.
जेवणात आळ्या सापडल्या म्हणून त्याबदल्यात कर्मचाऱ्यांना केवळ 200 रुपयाचा अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे 200 रुपयाचे अग्रिमही भविष्यात संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून वजा करणार आहे. एकतर तीन महिने पगार नाही, त्यात मुंबईला सेवा बजावायला यायचे आणि नाश्ता व जेवनाला मिळणारे पैसेही भविष्यात पगारातून वजा होणार अशा संकटात सध्या हे कर्माचारी सापडले आहेत.
300 रुपयांच्या भत्याची इंटकची मागणी
कर्मचाऱ्यांना वेळेत आणि पुरेसे जेवन पुरवण्यात येत नव्हते. त्यातच त्यांच्या जेवनात आळ्या सापडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावर इंटक या संस्थेने जेवन पुरवठा करणाऱ्या खासगी संस्थेचे कंत्राट रद्द करुन कर्मचाऱ्यांना 300 रुपये देण्यात यावे अशी मागणी केली होती.
एसटी कर्मचाऱ्यासमोरील अडचणी
कोरोना काळात एसटी महामंडळाचा व्यवसाय न झाल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसलाय. त्यांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार थकीत आहे. त्यातच मुंबईतील बेस्ट साठी सेवा देण्यासाठी त्यांना मुंबंईला बोलवण्यात आलंय. मुंबईत आल्यापासून त्यांच्या अडचणीत अधिकच भर पडलीय. त्यांना देण्यात येणारे जेवन हे निकृष्ट प्रतिचे होते. त्यात आळ्या सापडल्याचाही प्रकार समोर आला आहे.
या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय आरेतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. हे हॉटेल आधी क्वॉरंटाईन सेंटर होते. त्याची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली नाही, तिथल्या रुम्स अतिशय गलिच्छ आणि घाणेरड्या असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे केली होती. त्यावर कहर म्हणजे या कर्मचाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणात आळ्या सापडल्या होत्या.
सांगलीतून मुंबईत सेवा बजावण्यास आलेल्या 140 कर्मचाऱ्यांपैकी 104 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सोलापूर विभागातील 61 कर्मचारी कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवेढा येथिल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे आपलं गांव, जिल्हा, विभाग सोडून मुंबईत आलेल्या या कर्मचाऱ्यांना मनस्तापच अधिक सहन करावा लागतोय.
महत्वाच्या बातम्या: