Buldana News : जन्मत: कोणीच गुन्हेगार नसतो. पण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काहीजण चूकीचा मार्ग निवडतात हे आपण पाहिलं आहे. पण प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एका तरुणाने चक्क चोरीचा मार्ग निवडत दुचाकी, मोबाइल चोरी करण्यास सुरुवात केल्याची घटना बुलढाण्यातील शेगांव येथून समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक देखील केलं आहे. त्याचे जोडीदार अशा संपूर्ण टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेगांव शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही बाईक्स चोरांना पकडलं. यावेळी शेख शाहरुख शेख फिरोज, शेख मोबीन शेख हारुन, अमान खान अस्लम खान, मुशिफ खान अल्ताफ खान या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळून मुद्देमालही जप्त केला आहे. यावेळी तब्बल 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील शेख शाहरुख शेख फिरोज हा तरुण चक्क प्रेयसीच्या प्रेमापोटी आणि तिच्या महागड्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चोरी करु लागल्याचं तपासात समोर आलं आहे. तसंच शाहरुख हा उच्च शिक्षित असून नामांकित आणि प्रतिष्ठित घरातील आहे. आपल्या मैत्रिणीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चोरी करीत असल्याची कबुली त्याने स्वत: पोलिसांना दिली आहे. 


प्रेमासाठी 'काहीपण'


अलीकडे तरुणवर्गात हायटेक लाईफस्टाईल जगण्यासाठी काहीही करण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. तरुण-तरुणी एकमेकांना खुश करण्यासाठी "काहीपण" करु लागले आहेत. याच काहीपणच्या नावाखाली बुलढाण्यातील शेगांव येथे चार प्रतिष्ठीत कुटुंबातील तरुण चोरी करु लागले. या चौघांतील शेख शाहरुख शेख फिरोज याने पोलिसांसमोर प्रेयसीला खुश करण्यासाठी तिला महागड्या भेट वस्तू देण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला असल्याची कबलू देखील दिली. पण या टोळीचा हा चोरीचा फंडा जास्त काळ टिकला नाही आणि पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली.  त्यानंतर साऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान तरुणांनी अशाप्रकारचे मार्ग अवलंबू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 


हे ही वाचा : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha