राजकीय आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला. त्यानंतर हे साडेतीन नेते कोण याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. तर, दुसरीकडे अनेकांना पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाण्यांची आठवण झाली आहे. पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाणे कोण, जाणून घेऊयात संक्षिप्त माहिती 


पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाणे म्हणून सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर हे पूर्ण शहाणे म्हणून ओळखले जातात. हे तिघेही मुत्सद्दी आणि योद्धे होते. तर, उरलेले अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस यांचा उल्लेख करण्यात येतो. नाना फडणवीस हे मुत्सद्दी होते. मात्र, युद्ध कौशल्यात ते पारंगत नव्हते. त्यामुळे त्यांना अर्धे शहाणे असे म्हटले जाते. 


1) सखारामबापू बोकील: सखारामबापू हे बोकील घराण्याचे वंशज होते. महादजी पुरंदरे यांच्याकडे ते कारकून आणि शिलेदार होते. नानासाहेब पेशवे यांच्या कार्यकाळात त्यांचे युद्ध कौशल्य समोर आले.  कर्नाटकच्या मोहिमेत सदाशिवराव यांच्यासोबत गेले असताना त्यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. सखाराम बापू यांचे पेशवाईच्या काळात चांगले वजन निर्माण झाले होते. मात्र, लोभ, महत्त्वकांक्षा यामुळे त्यांच्याविरोधात एक प्रकारे अविश्वासही निर्माण झाला होता. नारायणराव पेशवे यांच्या हत्येतही त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला होता.  कर्तृत्व, मुत्सद्दीपणा आणि नैसर्गिक बुद्धीमत्ता यांच्या जोरावर त्यांनी मराठ्यांच्या राजकारणावर छाप सोडली. 


2) विठ्ठल सुंदर : हैद्राबादच्या निजामाच्या दरबारातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. विठ्ठल सुंदर हे पराक्रमी आणि हुशार होते. निजामाच्या दरबारात महत्त्वाचे स्थान विठ्ठल सुंदर यांना होते. राघोबादादांनी पेशवाई हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी पेशवाई गोंधळाची स्थिती होती. काका-पुतण्यांमधील भांडणाची संधी साधत पेशवाई उलथवून टाकावी आणि सातार छत्रपती राजाराम महाराज यांच्या ऐवजी नागपूरचे जानोजी भोसले यांच्या हस्ते मराठा कारभार सुरू करावा यासाठी डाव आखला. मात्र, पुढे घडलेल्या घडामोडींमुळे मनसुबा पूर्णपणे यशस्वी झाला नाही. पेशवाईचे विरोधक असलेले विठ्ठल सुंदर हे महत्त्वकांक्षी आणि बुद्धिमान होते. 


3) देवाजीपंत चोरघडे : नागपूरचे जानोजीराजे भोसले यांना सत्तास्थापनेसाठी मदत करणाऱ्यांमध्ये चोरघडे यांनी मुख्य भूमिका बजावली. नागपूरच्या भोसले घराण्याचे महत्त्वाचे राजकीय सल्लागार म्हणून चोरघडे यांची ओळख आहे. भोसले आणि पेशवाई दरबारात त्यांची हुशार मुत्सद्दी म्हणून ओळख होती. विठ्ठल सुंदर यांच्या पेशवाई उलथवून टाकण्याच्या कटात चोरघडे सहभागी होते. 


4) नाना फडणवीस : पेशवाईच्या साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस ओळखले जातात. चौदा वर्षांचे असताना नाना हे पेशव्यांचे फडणवीस झाले. प्रकृती अतिशय बारीक असणारे नाना फडणवीस हे युद्धकौशल्यापेक्षा मुत्सद्दी अधिक होते. त्याशिवाय इतरही छंद त्यांना लागले होते. नाना फडणवीस यांची मुत्सद्दीगिरी आणि ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांच्या पराक्रमाने मराठेशाहीला पुन्हा गतवैभव मिळाले. नाना फडणवीस यांच्या काळात पुण्यात अनेक सुधारणादेखील झाल्या. नाना फडणवीस यांच्या काही दुर्गुणांची आजही चर्चा होते.