वाशिम : वाशिच्या रिसोडमध्ये एका 22 वर्षीय तरुण व्यापाऱ्याने भूखंडाच्या व्यवहारातून आत्महत्या केली आहे.  नगरसेविकेच्या पतीच्या त्रासाला कंटाळून कल्पेश वर्मा या व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी रिसोडचे मुख्याधिकारी, नगरसेविका मीना अग्रवाल आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

कल्पेश वर्मा तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये कल्पेशने नगरसेविका मीना अग्रवाल यांचे पती अशोक अग्रवालचा उल्लेख केला आहे.

 

कल्पेशने सिव्हील लाईनमधील सरकारी भूखंड भाडेतत्त्वावर घेतला होता. पण त्यापैकी अर्धा भूखंड आपल्याला मिळावा यासाठी नगरसेविका मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक अग्रवाल आणि सुनील बगडिया यांनी कल्पेशला त्रास देणं सुरु केलं, असा आरोप कल्पेशच्या नातेवाईकांनी केला. इतकंच नाही तर पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पाणझाडे यांना हाताशी धरुन त्रास दिल्याचा आरोपही वर्मा कुटुंबीयांनी केला आहे.

 

सरकारी भूखंडापैकी अर्धा भाग नगरसेविकेचा पती अशोक अग्रवाल यांना दे, नाहीतर तुझ्या मालकीच्या जागेवर बुल्डोझर चालवू, अशी धमकी मुख्याधिकारी सुधाकर पाणझाडेने कल्पेशला दिली. त्यामुळे कल्पेश तणावाखाली होता. त्यातूनच कल्पेशने 7 एप्रिलच्या रात्री 2 ते 3 च्या दरम्यान आत्महत्या केला. सुसाईड नोटमध्ये त्याने नगरसेविकेचा पती अशोक अग्रवालच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला.