बेळगाव : तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा करण्यात आला. योगपटूंनी पाण्यात योगाची प्रात्यक्षिकं सादर केली.


बेळगावमध्ये जलतरण तलावात योगपटूंनी पाण्यात सादर केलेली विविध जलयोगाची प्रात्यक्षिके  योगदिनाचे आकर्षण ठरली. सकरप्पा गुळेदगुडी आणि त्यांची मुलगी श्रीदेवी तसेच अखिला नाईक, संजीव हांचीनमनी यांनी पाण्यात विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. याशिवाय शहरात अनेक संस्थांनी देखील योगदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



जिल्हा प्रशासनातर्फेही महात्मा गांधी भवन येथे आयोजित योग शिबिरात खासदार सुरेश अंगडी, जिल्हाधिकारी एन . जयराम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होऊन योगासने केली. प्रारंभी खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला .

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे पतंजली योगपीठाचे गुरु किरण मन्नोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. पाचशेहून अधिक जवान, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय योग्य शिबिरात सहभागी झाले होते.

योगदिनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी स्केटिंगपटूंनी कित्तूर ते बेळगाव अशी  पन्नास किलोमीटरची स्केटिंग रॅली काढली. वीसहून अधिक स्केटिंगपटू यामध्ये सहभागी झाले होते.