नागपूर : 5 वर्षाचा चिमुकला स्वयंम पांडे... मंगळवारी आईसोबत यशोदा शाळेत अॅडमिशन घेऊन आला. आईनं घरात पाऊल ठेऊन फक्त पाण्याचा तांब्याच उचलला, तेवढ्यात स्वयमनं घराची गच्ची गाठली. मात्र पुढे जे झालं त्याने प्रत्येकाचं मन हळहळलं.


11 हजार व्होल्टचा शॉक लागून स्वयंमचा कोळसा झाला. त्याची किंकाळी ऐकून आईसुद्धा गच्चीवर धावली, नशीबानं कुटुंबातल्या लोकांनी तिला आवरलं, म्हणून पुढचा अनर्थ टळला. हायटेन्शन वायरनं गेल्या काही दिवसात नागपुरात घेतलेला हा तिसरा बळी.

हिंगणा वीजकेंद्रातून नागपूरला वीजपुरवठा करणारी वायर एमआयडीसी भागातून जाते. इथं मोठा बाजारही भरतो. त्यामुळे जीव मुठीत घेऊन लोक इथं वास्तव्य करत आहेत.

हायटेन्शन वायर असलेल्या प्लॉटवर बांधकाम करायला परवानगी नसते. मग तरीही दुमजली, तीनमजली इमारती कशा उभ्या राहिल्या हा प्रश्न आहे.

प्रियांश आणि पियुषच्या कुटुंबांचे अश्रू सुकत नाहीत, तोवर स्वयमच्या आई-वडिलांवर काळ चालून आला.
दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवावर उठणारी कामं करायला ज्यांनी हातभार लावला, त्यांना जन्माची अद्दल घडायला हवी.

संबंधित बातम्या :


बिल्डरची चूक, हायटेन्शन वायरच्या स्पर्शानं दोन भावंडं भाजली


हायटेन्शन वायरचा शॉक लागून जुळी भावंडं भाजली, एकाचा मृत्यू


क्रिकेट खेळताना शॉक लागलेल्या दुसऱ्या जुळ्या भावाचाही मृत्यू