बेळगाव : बेळगावात 12 वं येळ्ळूर साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं. डॉ. श्रीपाद जोशी हे संमेलनाचे अध्यक्ष होते, तर हैदराबादमधील सायराबाद पूर्वचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घटन झालं.

"देशातील प्रत्येक व्यक्तीला मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे देशात, राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो मत व्यक्त करणाऱ्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. सीमाभागात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि मराठी भाषा ,संस्कृती जतन करण्यासाठी भरवली जाणारी साहित्य संमेलने प्रशंसनीय आहेत . सीमावासीयांचा लढा सीमाप्रश्न सुटेपर्यंत असाच सुरु राहूदे . महाराष्ट्र सरकारने सीमावासियांच्या लढ्याची दखल घेतली पाहिजे." असे उदगार डॉ . श्रीपाद जोशी यांनी येळ्ळूर येथील बाराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले .



मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन पाच सत्रात पार पडले . महापौर सरिता पाटील, उप महापौर संजय शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संमेलनाला उपस्थिती दर्शवली होती .

कोणते ठराव संमत झाले?

सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याच्या कामकाजात कोणतीही उणीव राहणार नाही याची महाराष्ट्र सरकारने काळजी घ्यावी आणि वकिलांना पाठबळ द्यावे असा ठराव येळ्ळूर येथील बाराव्या साहित्य संमेलनात एकमताने टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला.

सीमाप्रश्नाच्या ठरावा बरोबरच मराठा मोर्चा, सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार द्यावीत, सीमाभागात मराठी भाषांनी संस्कृतीचे जतन करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र सरकारने दरवर्षी निधी द्यावा, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावावा असे ठराव संमेलनात संमत करण्यात आले.



गावातून निघालेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. मुलींचे लेझीम पथक,झाँज पथक, मार्गावर केली जाणारी पुष्पवृष्टी, विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दिंडीच्या मार्गावरील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

उद्घाटनाच्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रात साहित्यिक वसंत लिमये यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. तिसऱ्या सत्रात विविध स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. चौथ्या सत्रात आयोजित कवी संमेलनात कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
शेवटच्या सत्रात अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीतून त्यांनी आपला अभिनय प्रवास उलगडला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. त्याचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला