बेळगाव : सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी दुर्मिळ म्हणून ओळखला जाणारा धामण जातीचा पिवळ्या रंगाचा साप सह्याद्री कॉलनीत पकडला. बेळगाव परिसरात तपकिरी रंगाचे धामण साप आढळतात. पण पिवळ्या रंगाचा धामण साप सापडल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.


सह्याद्री कॉलनीत एका निवासस्थानी साप आढळताच सर्पमित्र आनंद चिठ्ठी याना बोलाविण्यात आले. त्यांनी लगेच येऊन सापाला पकडले. साप पकडल्यावर पकडलेला साप धामण जातीचा असून दुर्मिळ म्हणून गणल्या जाणाऱ्या पिवळ्या रंगाचा आहे हे त्यांच्या ध्यानात आले.

पकडलेला पिवळ्या रंगाचा धामण साप तीन वर्षाची मादी आहे. याची लांबी 45 इंच असून त्याची जीभ आणि डोळ्याचा रंगही सर्वसामान्य धामण प्रमाणे काळसर नसून जीभ गुलाबी रंगाची तर डोळे लालसर रंगाचे आहेत.

गेल्या पंधरा वर्षांपासून मी साप पकडत आहे पण पिवळ्या रंगाचा धामण साप मात्र प्रथमच पाहिला असल्याचे सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी सांगितले.