नागपूर : "राणे समितीने केलेला अहवाल चुकीचा, असं हेडलाईनमध्ये म्हणायला काय जातंय? मी काय 94, 95 नव्हे, पूर्ण 96 कुळी मराठा आहे. जे करतो ते पूर्णच करतो. त्यामुळे मला शिकवायची गरज नाही.", असे म्हणत काँग्रेस नेते नारायण राणेंनी सभागृह दणाणून सोडलं.

हिवाळी अधिवशेनाच्या चौथ्या दिवशी विधनपरिषदेत मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सरकारला धारेवर धरलं. राणे समितीला नावं ठेवणाऱ्यांवरही नारायण राणेंनी घणाघात केला.

"94, 95 नव्हे, मी 96 कुळी मराठा"

"राणे समितीने केलेला अहवाल चुकीचा, असं हेडलाईनमध्ये म्हणायला काय जातंय? मी काय 94, 95 नाही नव्हे, पूर्ण 96 कुळी मराठा आहे. जे करतो ते पूर्णच करतो. त्यामुळे मला शिकवायची गरज नाही.", असे म्हणत काँग्रेस नेते नारायण राणेंनी सभागृह दणाणून सोडलं.

"राज्य तुमचं, मात्र रिमोट कंट्रोल दुसरीकडे"

त्यानंतर नारायण राणे यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. राणे म्हणाले, "राज्य जरी तुम्ही करत असला, तरी तुमचा रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि त्यांना आरक्षण द्यायचं नाही."

"मराठा आरक्षण प्रस्तावात 11 वेळा मुख्यमंत्र्यांचं नाव"

"प्रवीण दरेकरांनी सत्ताधाऱ्यांकडून मराठा आरक्षणावर प्रस्ताव मांडला. त्यात मुख्यमंत्र्यांचं 11 वेळा नाव, चंद्रकांतदादांचं 4 वेळा नाव, तर विनोद तावडेंचं एक वेळाच नाव आहे. अहो, प्रस्ताव कसला आहे, बोलता काय. मी सगळं लिहून ठेवलं आहे.", असे म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

मराठा मोर्चासाठी रेल्वे द्या, अन्यथा....

नागपुरातील मराठा मोर्चा शांततेच होईल. बंदी घालू नका, रेल्वे द्या, नाहीतर राज्यात एकही ट्रेन धावणार नाही. मोर्चाला गालबोट लागणार नाही, मात्र जबाबदारी सरकारची आहे.", असा इशाराही नारायण राणेंनी सरकारला दिला.