यवतमाळ : यवतमाळच्या दिग्रज तालुक्यातल्या बोरी गावातल्या विलायतकर कुटुंबामध्ये नवी पाहुणी सामील झाली आहे. पण ही पाहुणी आहे एका माकडीणीचं पिल्लू. विलायतकर कुटुंबात येण्याची तिची कहाणीही भयंकर आहे.
त्या माकडीणीच्या मागे कुत्रे लागले आणि माकडीणीनं तारेवर उडी मारली. त्यातच तिचा मृत्यू झाला. पिल्लूही भाजलं. आम्ही त्याची सुटका केली आणि त्याला घरी आणलं, असं पिल्लाचे पालक रवी विलायतकर सांगतात.
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या पिल्लावर उपचार केले. विलायतकरांची स्थितीही बेताची. कुडाच्या घरात संसार, पण या कुटुंबानं या पाहुणीला मोठ्या मनानं स्वीकारलं. तिला नाव दिलं 'राणी'... राणीनं इतका लळा लावला, की पोरं आता या राणीवाचून राहातच नाहीत.
राणी इतकी माणसाळली की रोज तिची आंघोळ-पांघोळही होते. इतकंच नाही, तर पोरं तिला लाली पावडरही करतात.
खरं तर वन खात्याच्या आदेशावरुन या माकडाला पुन्हा जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला होता. पण माकडांची टोळी या राणीच्या जीवावर उठली होती. त्यामुळे आणखी काही दिवस राणीला सोबत राहू देण्याची विलायतकरांची विनंती वन विभागाने मंजूर केली आहे.
आईच्या छातीपासून दुरावलेल्या राणीला विलायतकरांनी मायेची उब दिली. काही वर्षांपूर्वी शाळेत एक धडा होता 'लळा'. अगदी तसाच लळा या राणीने कुटुंबीयांना लावला आहे. पण राणीचं खरं आयुष्य हे निसर्गात आहे. एकदा ती सक्षम झाली, की तेच आयुष्य तिला मिळावं, इतकीच अपेक्षा आहे.