नागपूर : प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी 52 तास स्वयंपाक करण्याचा विक्रम रचला आहे. या 25 तासांमध्ये त्यांनी एकूण 1 हजार पदार्थ बनवल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आज रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता विष्णू मनोहर यांचा 52 तासांचा स्वयंपाकाचा विक्रम पूर्ण झाला. विक्रम पूर्ण होताक्षणी त्यांनी चणाडाळीचा हलवा अन्नपूर्णेला नैवेद्य दाखवला.


मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिन‌िअर्स येथे शुक्रवारी मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात विष्‍णू मनोहर हे सलग 52 तासांत एक हजारापेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करुन नवा विश्वविक्रम रचला आहे.

यापूर्वी 40 तास सलग स्वयंपाक करण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला आहे. 12 मार्च 2014 रोजी 40 तास कुकिंगचा विक्रम अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांनी नोंदवला आहे. विष्णू मनोहर यांनी हा विक्रम नागपुरात मोडला आहे.

शुक्रवारी 21 एप्रिलला सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. आज 23 एप्रिलच्या सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत हा खाद्यपदा‌र्थांचा उत्सव चालला. या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले आहेत. केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील आहेत.