बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात जणांना फाशी
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 08:27 PM (IST)
सात वर्षांच्या सपना गोपाल पळसकरचा तिच्या सख्ख्या नातेवाईकांनीच बळी दिला होता. कुळाचं आणि गावाचं भलं व्हावं, यासाठी सपनाचा नरबळी देण्यात आला होता.
यवतमाळ : यवतमाळमधील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. गावाच्या भल्यासाठी सपनाचा बळी देणाऱ्या सात जणांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2012 मध्ये यवतमाळमधील घाटंजी तालुक्यात चोरंबा गावात हा प्रकार घडला होता. सात वर्षांच्या सपना गोपाल पळसकरचा तिच्या सख्ख्या नातेवाईकांनीच बळी दिला होता. कुळाचं आणि गावाचं भलं व्हावं, यासाठी सपनाचा नरबळी देण्यात आला होता. आरोपींमध्ये मनोज आत्राम (मामा), देवीदास आत्राम, यादवराव टेकाम, पुनाजी आत्राम (आजोबा), रामचंद्र आत्राम, मोतीराम आत्राम, आणि यशोदा मेश्राम (आजी) यांचा समावेश आहे. या सातही जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. तर दुर्गा शिरभाते हिला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस वाघमारे यांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरुन निर्णय देत शिक्षा सुनावली. तब्बल पाच वर्षांनी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली.