अकोला : शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन झाले आहेत. अकोल्यात त्यांच्यावर दुपारी दीड वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा या त्यांच्या गावी महाराष्ट्राच्या या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी लोणाग्रा पंचक्रोशीतील हजारो नागरिक, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस आणि लष्करातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शहीद सुमेध गवई यांच्या पार्थिवाला त्यांचे वडील वामनराव आणि लष्करात कार्यरत असलेला छोटा भाऊ शुभम यांनी भडाग्नी दिला. यावेळी लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांकडून शासकीय मानवंदना देण्यात आली.

जम्मू-काश्मिरमधील शोपीया येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सुमेध यांना वीरमरण आलं. ‘सुमेध गवई अमर रहे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे यावेळी देण्यात आले.

काल रात्री विशेष विमानाने सुमेध यांचं पार्थिव नागपुरात आणण्यात आलं. आज सकाळी नागपूरवरून लष्काराच्या विशेष वाहनानं त्यांचं पार्थिव अकोला जिल्ह्यातील त्यांच्या लोणाग्रा गावी आणण्यात आलं. दुपारी बारा वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली.

राज्य सरकारच्या वतीनं पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तर लष्काराच्या वतीनं कॅप्टन आशिषसिंह चंदेल यांनी त्यांना मानवंदना दिली.

सुमेध 2011 मध्ये सैन्यामध्ये भरती झाले होते. ते 11 महार बटालियनमध्ये काश्मिरातील शोपिया सेक्टरमध्ये कार्यरत होते. सुमेध यांच्या पश्चात आई मायावती, वडील वामनराव, लग्न झालेली लहान बहीण आणि लष्करातच असलेला छोटा भाऊ शुभम असा परिवार आहे.