यवतमाळ : बंदी असलेली कीटकनाशकं कुणाकडे सापडत असतील, तर अशी व्यक्ती आणि कंपन्यांवर कलम 307 आणि संघटित गुन्हेगारीसारखे गुन्हे दाखल करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीच्या त्रासामुळे जवळपास 22 शेतकऱ्यांनी जीव गमावल्यानंतर मुख्यमंत्री यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली.

इतक्या घटना घडल्यानंतरही जर कुणी कीटकनाशकं बाळगत असेल, तर त्याच्यावर सक्त कारवाई करावी, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

कीटकनाशकांमुळे 700 हून जास्त गावकऱ्यांना विषबाधा झाली होती, तर एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. अद्यापही बऱ्याच रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. शेतकरी आत्महत्या प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या दहा पोलिस ठाण्यात ही फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

कर्जमाफीच्या बाबतीत फडणवीस सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.