यवतमाळ : यवतमाळमध्ये पैनगंगा नदीत सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटून दोघा अल्पवयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. तर तिघा युवकांना वाचवण्यात यश आलं आहे.
मोहरम निमित्त तेलंगणातील आदिलाबादमध्ये राहणारे पाच युवक झरी तालुक्यातील राजूरमध्ये आले होते. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सर्व जण पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले. सर्व जण तेलंगणातील आदिलाबदचे रहिवासी आहेत. त्यांचं कुटुंब दरवर्षी मोहरम सणानिमित्त राजुरला येतं.
नदीत बोट पाहून सर्वांना तिच्यात बसण्याची आणि सेल्फी काढण्याची इच्छा झाली. त्यामुळे पाचही जण त्या होडीत बसले. मात्र सेल्फी काढताना तोल जाऊन होडी उलटली आणि पाचही जण पाण्यात पडले.
पाचही जणांना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं, मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तिघांना पोहता येत असल्यामुळे ते बचावले. तिघा जणांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.