सातारा : उच्च न्यायालयाने डॉल्बीच्या निर्णयाबाबत पुढची तारीख दिली असताना, साताऱ्यात डॉल्बी वाजणारच, या खासदार उदयनराजे यांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस डॉल्बीविरोधात स्वतः रस्त्यावर उतरले होते.
विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखही या रॅलीत सहभागी झाले होते. स्वत: पोलिसांनीच रस्त्यावर उतरण्याचं राज्यातील हे पहिलेच उदाहरण म्हणावं लागेल.
सातारा पोलिसांनी शाळकरी विद्यार्थ्यांना डॉल्बी विरोधातल्या भूमिकेमध्ये सहभागी करुन, शहरातून खास रॅली काढली. यामध्ये स्वतः एसपी पंकज देशमुख हेसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
भारतीय संस्कृतीतील मुलींचा ढोल-ताशा आणि पोलिसांचा बँड पथक हे विशेष. विद्यार्थ्यांच्या हातात डॉल्बी विरोधातील फलकही देण्यात आले होते.
दरम्यान, डॉल्बी विरोधातली भूमिका पोलिसांची निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र उदयनराजे यांनी दिलेल्या आव्हानाला हे पोलिसांचे एक वेगळं आव्हान म्हणावं लागेल. त्यामुळे उदयनराजे आता काय भूमिका घेतात, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
डॉल्बीसाठी उदयनराजे आक्रमक
कोर्टाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या भूमिकेवर ठाम असून, कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असंही उदयनराजे म्हणाले.
गणेशोत्सव शांततेत साजरा होईल – विश्वास नांगरे पाटील
दुसरीकडे डॉल्बी वाजवू न देण्याच्या भूमिकेवर पोलिसही ठाम आहेत. दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली होती. गणेशोत्सव शांततेत साजरा केला जाईल असा विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला होता. हायकोर्टाच्या नियमांच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं होतं.