इंदापूर : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या पाणीप्रश्नावरुन आक्रमक रुप धारण केलंय. इंदापूर तालुक्याला हक्काचं पाणी मिळावं म्हणून पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुका काँग्रेसने हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्त्वात रास्ता रोको आंदोलन केलं.


पावसाने पाठ फिरवल्यामुळे इंदापूर तालुक्यात ऊसाची पिके, फळबागा, भाजीपाला व जनावरांचा चारा यांसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील सर्व पाझर तलाव कोरडे पडले आहे. शेजारीच असलेल्या बारामती आणि दौंड तालुक्यात खडकवासला व भाटघर धरणाचे पाणी कालव्यातून मिळाले. मात्र इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले नसल्याच्या कारणाने आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पळसदेव या गावी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून ठेवला होता.

पाणीप्रश्नावरील काँग्रेसच्या या आंदोलनाला तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. मोठा जनसमुदाय या आंदोलनात सहभागी झाला होता.

निष्क्रीय आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळेच तालुक्यावर ही वेळ आली असल्याचा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आणि खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडून तालुक्यातील 27 पाझर तलाव भरावेत, अशी मागणी केली.

आंदोलनावेळी निवेदन स्वीकारण्यास आलेल्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी चांगलेच कोंडीत पकडले होते आणि पाणी का सोडत नाही, याचा जाब संतप्त आंदोलकांनी विचारला.

आमदार दत्तात्रय भरणेंचा पलटवार

मागील 20 वर्षे मंत्री असलेल्या या हर्षवर्धन पाटलांनी पाण्याचा योग्य नियोजन केले असते, तर ही वेळ इंदापूरच्या जनतेवर आली नसती. कालवा सल्लागार समितीवर पाटील हेही सदस्य आहेत. त्यामुळे मी जेवढा जबाबदार आहे, तेवढे पाटील पण जबाबदार असल्याचे सांगत भरणे यानी त्यांच्या आरोपांचे खंडन केले आहे.