अवनी वाघिणीला ठार करणाऱ्या शिकाऱ्यांचा यवतमाळमध्ये सत्कार
एबीपी माझा वेब टीम | 03 Nov 2019 10:37 AM (IST)
यवतमाळमधल्या राळेगाव परिसरामध्ये 13 जणांचे बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीला ठार मारणाऱ्या नवाब असगर अली आणि नवाब शाफत अली खान यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव परिसरामध्ये 13 जणांचे बळी घेणाऱ्या टी-वन वाघिणीला ठार मारणाऱ्या नवाब असगर अली आणि नवाब शाफत अली खान यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. नवाब पिता पुत्रांनी परिसरात ठाण मांडून गरिबांचे जीव वाचविले तरीदेखील वनविभागाने त्यांना दुर्लक्षित ठेवले होते. त्यामुळे टी-वन वाघिणीला ठार मारल्याच्या वर्षपूर्तीला नवाब पिता पुत्र आणि त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला आहे. सरकारने सहाय्य केले नसल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी करुन 21 हजार रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द केला. टी-वन वाघिणीच्या शिकारीनंतर तिच्या एका बछड्याचा बंदोबस्त करण्यात आल्याने ग्रामस्थ भयमुक्त झाले आहेत. परंतु तिच्या दुसऱ्या बछड्याची आणि एका वाघाची परिसरात दहशत आहे. नरभक्षक टी वन वाघिणीला ठार मारल्याने देशभर वादंग झाले. शुटर नवाब पितापुत्रांवर टीकेची झोड उठवली गेली. तर दुसरीकडे यवतमाळच्या ज्या गावांमध्ये वाघिणीची दहशत होती त्या ग्रामस्थांनी शुटर नवाब पितापुत्र आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत. अवनी वाघिणीच्या पकडलेल्या बछड्याचा व्हीडिओ समोर | यवतमाळ | एबीपी माझा