मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल (02 नोव्हेंबर) मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य करुन राज्यात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभेचे सदस्य आहेत किंवा समाजातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.


अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यानंतर सर्वजण विचार करत आहेत की, सभागृहात नसलेली आणि समाजात महत्त्वाचे स्थान असलेली तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊ शकेल अशी व्यक्ती कोण आहे? भाजपशिवाय सत्तास्थापन करायची असेल, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार होऊ शकते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे किंवा शरद पवार या दोघांपैकी कोणी एक व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते, असे कयास बांधले जात आहेत.


शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत, तसेच राज्यातील प्रमुख नेते आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत दुसरा सर्वात मोठी पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यांच्याकडे 63 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकजण राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊ शकतो, असे बोलले जात आहे.


शिवसेनेला त्यांचा मुख्यमंत्री हवा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नाव स्पर्धेत आहे. काँग्रेस जर बाहेरुन पाठिंबा देत असेल तर असं कोणतं नाव आहे ज्याला समाजात आदराचे स्थान आहे, अनुभव आहे आणि त्याचे नेतृत्व स्वीकारले जाईल? असा प्रश्न उपस्थित झाला तर सर्वांच्या तोंडी एकच नाव असेल, ते म्हणजे शरद पवार.


त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले तर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यापैकी एक जण मुख्यमंत्री होऊ शकतो.


याधी काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे वर्ष 2003-2004 मध्ये दिल्लीतून येऊन मुख्यमंत्री झाले होते. त्याआधी ते लोकसभेत होते. पृथ्वीराज चव्हाण हे देखील केंद्रात पीएमओमध्ये मंत्री असताना आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांचा राजीनामा झाल्यावर त्यांना राज्यतील मुख्यमंत्री पदाची जबादारी मिळाली होती. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता विधीमंडळात नसलेल्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळू शकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


दरम्यान आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. अजित दादा यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. मात्र दुर्दैवाने ते मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होत राहणार की नेमकं राज्यात मुख्यमंत्री होण्याची संधी कोणाला मिळणार, कुणाची सत्ता येणार?


कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? नेमकं काय म्हणाले अजित पवार?