यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात भर मंडपात नवरदेवाला बेड्या ठोकण्यात आल्या. नेर तालुक्यातील व्याहळी गावात ही घटना घडली.


नेर पोलिसांनी आरोपी नवरदेवाला अटक केली आहे. सुनील जाधव असं त्याचं नाव आहे. कमी पैशात सोनं देण्याच्या आमिष दाखवून त्याने अनेकांना गंडा घातला होता.

रेल्वे आणि बसमध्ये प्रवासादरम्यान सुनील जाधव आपली शिकार शोधत असे. परिचय वाढवून त्यांना कमी पैशांत सोनं देण्याचं आमिष द्यायचा. त्यानंतर निर्जन ठिकाणी बोलावून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेऊन दगडाची पिशवी द्यायचा. त्याचवेळी त्याचे तीन साथीदार पोलिसांच्या वेशात यायचे. पोलिस आल्याचं सांगत सुनील तिथून पळ काढून लोकांची फसवणूक करायचा.

सुनील जाधवने अशाप्रकारे आकोटमधील एका व्यक्तीला गंडा घातला होता. या प्रकरणात पोलिस त्याच्या शोधात होते. त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. तर सुनील मात्र पसार झाला होता.

या दरम्यान व्याहाळी गावात सुनीलचं काल (शुक्रवार) लग्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बोहल्यावर चढण्यापूर्वी पोलिस तिथे दाखल झाले आणि त्याला बेड्या ठोकल्या.

ज्या मुलीशी सुनीलचं लग्न होणार होतं, तिनेही चोरासोबत लग्न करायचं नाही, असं सांगत  लग्नं मोडलं.