Yavatmal News : चहासाठी जन्म आमुचा... असं अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. चहा म्हणजे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. दिवसाची सुरुवात असो, वा कट्ट्यावरच्या गप्पा किंवा मग रेंगाळणारी संध्याकाळ... चहा हवाच. सध्या अनेक कॅफे, रेस्टॉरंट्समध्ये चहाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच अनेकांनी वेगवेगळे चहाचे प्रकारही शोधून काढले आहेत. अशाच शोध लावलाय यवतमाळमधील एका पठ्ठ्यानं. या अवलियानं चक्क कागदावर चहा तयार केलाय. ऐकून धक्का बसला ना? खरंच. या पठ्ठ्यानं कागदावर चहा बनवलाय. संपूर्ण जिल्ह्यात या मॅजिक 'चहा'ची चर्चा रंगली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील अब्बास भाटी या व्यक्तीनं कागदावर तयार केलेल्या गरमागरम मॅजिक 'चहा'ची सर्वत्र चर्चा आहे. खरंतर सकाळी चहा प्यायल्याशिवाय अनेकांची कुठल्याही कामाची सुरुवात होत नाही. तर चहाशिवाय एकत्र जमलेल्या घोळक्यात चर्चांना रंगत चढत नाही. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये आले होते त्यावेळी त्यांनीही यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथील शेतकऱ्यांशी 'चाय पे चर्चा' करून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. तेव्हापासून दाभडी गावातील चहाची सर्वत्र चर्चा होतीच. आता त्याच आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील अब्बासनं कागदावर बनवलेल्या मॅजिक चहाची सर्वत्र चर्चा आहे.
यवतमाळमधील अब्बासची चहा तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. विटेची चूल, काडीचा विस्तव आणि कागदांचा गंज या सर्व साहित्यांच्या मदतीनं अब्बास चहा करतो. आगीजवळ कागद नेला तरी कागद जळून खाक होतो. मात्र आग ओकणाऱ्या विटांच्या चुलीच्या कागदाचा गंज तयार करून त्यात पाणी, दूध, चहापत्ती, साखर वेलची टाकून तयार केलेला चवदार चहा अब्बास गावकऱ्यांना पाजतो.
कवठा बाजार येथे राहणारा अब्बास केवळ 10 वी पास आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 5 एकर शेती आहे. याच शेतातील पिकांचे सिंचन करतो. यासाठी कधी त्याला रात्री पिकांना पाणी द्यावे लागते, आता त्याच्या शेतात त्यानं हरभरा पिकाची लागवड केली आहे. अशाच एका रात्री तो पिकांना पाणी देत असताना ओल्या मातीत काम केल्यामुळे थंडीत अब्बासचे हात पाय गार पडले, अशावेळी त्यानं शेतात चहासाठी साहित्याची जुळवाजुळव केली. घरून त्यानं कागद आणि रूमालामध्ये बांधून चहापत्ती आणि साखर आणली होती. मात्र चहाचे भांडे 'गंज' काही त्याला दिसलं नाही. शेतात असलेल्या कुत्र्यानं ते भांडं पळवलं होतं. त्यामुळे आता चहा कसा बनवायचा? असा प्रश्न त्याच्या समोर होता. त्यावेळी अब्बास याने शेतात विटांची चूल, काडीचा विस्तव आणि कागदाचा गंज हे सर्व घेऊन त्यानं चहा तयार केला.
आब्बासच्या प्रयत्नांना यश आलं. चहा तयार झाला. त्याची चहाची तलब भागली आणि त्याला चहा पिल्यावर तरतरी आली. मग काय त्याला अशाच पध्दतीनं बनवलेल्या चहामध्ये यश येत गेलं. त्यानंतर त्यानं अशाच पद्धतीनं चहा बनवून अनेकवेळा चहा करून घरच्यांना आणि मित्रांना पाजला. आता तो एकवेळी जास्तीत जास्त 3 कप चहा कागदावर तयार करतो. अब्बासच्या कागदावर उकळी घेणाऱ्या चहाची चर्चा आता पंचक्रोशीत आहे.