यवतमाळ : चार मुलींनंतर पुन्हा जुळ्या मुली झाल्याने, त्यापैकी एका मुलीच्या मृत्यूप्रकरणी वडील आणि आजीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यवतमाळमधील चिल्लीत ही घटना घडली आहे. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.


चिल्लीतील शेतमजूर रंजना राठोड या महिलेला चार मुलींनंतर पुन्हा जुळ्या मुली झाल्या. मात्र जुळ्या मुलींपैकी एकीचं वजन कमी म्हणजे दीड किलो होतं. तिचा आज सकाळी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर बाळाचं शवविच्छेदन केलं असता, तिचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं.

बाळाचा गळा कोणी दाबला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलीच्या वडील आणि आजीला ताब्यात घेतलं असून, अज्ञाताविरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे.

चार मुलींनंतर पुन्हा जुळ्या मुली झाल्याने राठोड कुटुंबीय आनंदी नव्हतं. त्यामुळे कुटुंबातीलच कोणीतरी हे कृत्य केलं असावं, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

दरम्यान, या मुलीची आई सध्या यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आहे.