यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात 13 ग्रामस्थांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी वन वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आले आहे. कक्ष क्र 149 मधल्या शोध पथकातील शिकाऱ्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या वाघिणीने शोध पथकावर चाल केल्याने तिच्यावर थेट गोळी झाडून ठार मारण्यात आलं आहे.


11 सप्टेंबरला वाघिणीला जेरबंद करा अथवा ठार मारा, असा मुख्य वनसंरक्षकांचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून टी1 या वाघिणीचा शोध सुरु होता. काल (2 नोव्हेंबर) रात्री राळेगावच्या जंगलात मिशन टी1 कॅप्चर या ऑपरेशनला सुरुवात केली.



अखेर मध्यरात्री राळेगावच्या जंगलात मध्यरात्री पाच वर्षांच्या या वाघिणीला ठार करण्यात आलं. हैदराबादमधील शार्प शूटर नवाब शाफत अली खान यांचा मुलगा असगरने वाघिणीला ठार केलं. परंतु आता तिच्या 11 महिन्यांच्या दोन बछड्यांना जिवंत पकडण्याचं आव्हान वनविभागाच्या पथकासमोर आहे. ते लवकर सापडले नाहीत तर आईशिवाय ते जंगलात जगू शकणार नाही.

दरम्यान, मृत वाघिणीला गोरेवाडा इथल्या केंद्रावर नेलं आहे. नागपूरमध्ये शवविच्छेदन करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गावकऱ्यांचा जल्लोष
दुसरीकडे T1 वाघिणीला ठार मारल्याने बोराटी गावच्या ग्रामस्थांनी आज फटाके फोडून, लाडू वाटून आनंद साजरा केला असता. "आता लवकर या भागातील वाघिणीचे दोन बछडे आणि एक नर वाघ जेरबंद करा," अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. "आता शेतात आणि जनावरं चरायला घेऊन जाण्यास भीती वाटणार नाही," असं गावकऱ्यांनी सांगितलं.