यवतमाळ : यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाघिणीच्या पावलांच्या ठशांपाठोपाठ आता 656 नंबर कंपार्टमेंटमध्ये या वाघिणीचा बछडाही आढळून आला आहे. त्यामुळे वनविभागाच्या शोध मोहिमेचं यश नजरेच्या टप्प्यात आल्याचं बोललं जात आहे.

Continues below advertisement


गेल्या 20 दिवसांपासून नरभक्षक वाघिणीच्या शोधासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. वाघिणीला तिच्या बछड्यांसह जेरबंद करण्यासाठी मध्य प्रदेशच्या कान्हा जंगलातील चार हत्ती आणि चंद्रपूरच्या ताडोबामधून एक हत्ती यवतमाळमध्ये आणण्यात आले होते. मात्र हत्तींच्या चमूची वाघिणीला जेरबंद न करताच घरवापसी करावी लागली होती. कारण, साखळी तोडून पळालेल्या एका हत्तीने एका महिलेचा जीव घेतला होता, तर एका पुरुषाला जखमी केलं होतं.


याशिवाय वाघीण रात्री कुठल्या भागात फिरते, याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रोन वन विभागाने बोलावले असून त्याद्वारे वाघिणीचा शोध घेतला जात आहे.


यवतमाळ जिल्ह्यात टी वन वाघिणीची मोठी दहशत आहे. मागील 2 वर्षात या वाघिणीने 13 शेतकरी, शेतमजूर आणि गुरख्याची शिकार करणाऱ्या वाघिणीने 100 पेक्षा जास्त जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ, शेतकरी वाघिणीच्या भीतीत जगत आहे.


या नरभक्षक टी वन वाघिणीने शेवटचा बळी ऑगस्ट अखेर घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश आला. जेरबंद करण्याचे पूर्ण करुनही शक्य नाहीच झालं, तरच ठार मारण्याच्या पद्धतीचा वन खात्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही उचलून धरला.