याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी यवतमाळमधील पालक आणि नागरिक एकत्र आले आणि त्यांनी दर्डांविरोधात घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर तोडफोडही केली.
संतप्त महिला पालकांनी किशोर दर्डा यांच्या घराबाहेर बांगड्या फोडल्या. किशोर दर्डा हे पब्लिक स्कूलचे सचिव आहेत. याप्रकरणी विजय दर्डा यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
काय आहे प्रकरण?
विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अमोल क्षीरसागर आणि यश बोरूंदीया अशी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावं आहे.
या दोन्ही शिक्षकांकडून मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार शाळेच्या विद्यार्थिंनीनी केली. हा धक्कादायक प्रकार समजताच संतप्त पालकांनी संपूर्ण शाळेला घेराव घातला.
दरम्यान, शाळेचे संस्थाचालक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून होतो आहे. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. तसंच शाळेचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.