यवतमाळ: शेतीच्या फेरफारासाठी 1500 रुपये लाच घेताना महिला तलाठीला अटक करण्यात आली आहे. रंजना साखरवाड असं या लाचखोर तलाठीचं नाव आहे. 


उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर पीरंजी इथं ही घटना घडली.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून, रंजना साखरवाडला रंगेहाथ पकडलं.

वडिलोपार्जीत शेती आपल्या नावाने करण्यासाठी रितसर अर्ज करूनसुद्धा, मागील सहा महिन्यापासून साखरवाड यांनी चकरा मारायला लावल्या.

जानेवारीमध्ये अर्ज केल्यावर काही दिवसांनी खर्च पाणी करावा लागेल असे सांगत 2 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 1500 रुपये देण्याचे ठरले.

यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागात याबाबतची तक्रार नोंदवली. त्यानंतर काल सायंकाळी विभागाच्यावतीने सापळा रचून उमरखेड येथील खडकपुरा परिसरातील तलाठी कार्यालयात 1500 रुपये लाच स्वीकारताना साखरवाडला रंगेहाथ पकडले.

प्रभारी पोलिस उपअधीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.