नागपूर : नागपुरातील वेणा तलाव दुर्घटनेतून बचावलेल्या अमोल दोडके या तरुणाने सेल्फी किंवा फेसबुक लाईव्हमुळे बोट दुर्घटना घडली नसल्याची माहिती दिली आहे. बोटीत पाणी शिरल्यामुळे ती उलटून अपघात झाल्याचं अमोलने म्हटलं आहे.


पोहता येत असल्यामुळे अमोल दोडके आणि त्याचा भाऊ या बोट दुर्घटनेतून बचावले, तर त्यांच्या आठ मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

काय म्हणाला अमोल?

वाढदिवस, लग्न किंवा जॉब अशा कुठल्या सेलिब्रेशनसाठी नाही, तर वीकेंड असल्यामुळे सर्व मित्र वेणा तलावावर गेलो होतो. बोटवाल्याला तलावात एक चक्कर मारुन आणण्यास सांगितलं. खूप जण असल्यामुळे आम्ही दोन बोटींची मागणी केली. मात्र आमच्यासाठी हे नेहमीचं आहे, असं सांगत नावाड्याने एकाच बोटीतून आम्हा दहा जणांना नेलं, असं अमोल म्हणाला.

परतीच्या वाटेवर असताना मोठ्या लाटेमुळे नाविकाने बोट थांबवली. लाटेमुळे थोडं पाणी बोटीत आलं. तेव्हा सगळे शांत बसलो होतो, मात्र पाण्यामुळे राहुल या मित्राची पँट ओली झाली. तो उभा राहिला. राहुल वजनाने जड असल्यामुळे बोट एकीकडे झुकली आणि त्या बाजुने पाणी आत आलं. आम्ही बोट सावरण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या बाजुनेही पाणी आलं, असं अमोलने सांगितलं.

...तर नागपुरात बुडालेल्या 'त्या' तरुणांचे प्राण वाचले असते?


बोटीत पाणी भरलं, त्यामुळे ती सरळ खाली गेली. सगळे घाबरले होते. मी आणि माझ्या भावालाच पोहता येत होतं. आम्ही नावाड्याला सांगितलं, आम्ही बोटीला हात लावतो. त्याने आमचं ऐकलं नाही. घाबरुन त्याने पाण्यात उडी मारली. सगळ्यांनीच भिऊन पाण्यात उड्या टाकल्या. बोटवाल्याने हिंमत दाखवली असती तर सगळे वाचलो असतो, अशी खंत अमोलने व्यक्त केली.

फेसबुक लाईव्हच्या नादात जीव गेला, नागपूरमध्ये 11 तरुण बुडाले


फेसबुक लाईव्ह किंवा सेल्फीच्या नादात बोट बुडाली नाही, असा खुलासाही अमोलने केला. त्यावेळी बोट बुडाली असती तर सगळे वाचलो असतो. त्या भागात पाणी खोल नव्हतं. तिथे बोट बुडाली असती तरी सगळ्यांचे पाय जमिनीला लागले असते, असं अमोल म्हणतो.

लग्न तोंडावर असताना वेणा तलावात बुडून परेशची एक्झिट


फेसबुक लाईव्ह केल्यानंतर 20-25 मिनिटांनी हा प्रकार घडला. खोल पाण्यात सेल्फीचा नाद कोणीच नाही केला. सगळे नीट बसले होते. बोटीत पाणी शिरलं तेव्हा ते बाहेर काढायला आम्ही सगळ्यांना सांगितलं. पण बोट उलटली. आम्ही एकमेकांना पकडलं. परेशला अर्ध्यापर्यंत आणलं, पण त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. दोघंही बुडायला लागलो म्हणून मी त्याला झटका मारुन बाहेर आणतो, असं म्हटलं, पण तो हाताला लागला नाही, असं सांगताना अमोलला अश्रू अनावर झाले.

पाहा व्हिडिओ :