यवतमाळ : व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना यवतमाळ पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली आहे. विषेश म्हणजे अटक झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. शुभम तोलवानी असं त्याचं नाव असून त्याच्यासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरातून ईश्वर नचवाणी या व्यावसायिकाच्या 18 वर्षीय मुलगा हर्ष नचवाणीचं अपहरण करण्यात आलं होतं. भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून हर्ष नचवाणीचं अपहरण केलं. त्यानंतर ते हर्षला जंगलात घेऊन गेले आणि तिथे त्याला मारहाण केली. मग अपहरणकर्त्यांनी हर्षच्या वडिलांना व्हिडीओ कॉल करुन 50 लाखांची खंडणी मागितली. तासाभरात रक्कम मिळाली नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती .
या घटनेमुळे घाबरलेल्या ईश्वर नचवाणी यांनी पोलिसांत धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पाऊल उचललं. पोलिसांची सहा पथकं तयार करुन हर्षचा शोध सुरु केला. यवतमाळजवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातील जंगलासह अनेक ठिकाणं पिंजून काढली आणि अवघ्या दहा तासाच्या आत सर्व अपहरणकर्त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने अपहरण करुन हरलेले पैसे मिळवण्यासाठी आरोपी शुभम तोलवानी आणि त्याच्या पाच साथीदारांनी हर्षच्या अपहरणाचा कट रचला होता, हे पोलिस तपासात उघड झालं आहे. हर्ष सुखरुप घरी परत आल्याने त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला आहे.
यवतमाळमधील अपहरणनाट्याचा उलगडा, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी मास्टरमाईंड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2019 11:19 AM (IST)
यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरातून ईश्वर नचवाणी या व्यावसायिकाच्या 18 वर्षीय मुलगा हर्ष नचवाणीचं अपहरण करण्यात आलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -